रायगड -महाड औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या काळ नदी पात्रात एका मच्छीमारावर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दिनकर महाडीक (वय 65 राहणार नांगलवाडी तालुका महाड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाण्यातुन मगर समोर येत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने महाडीक यांना किरकोळ दुखापत झाली.
काळ नदी पत्रात गेल्याकाही दिवसांपासून मगरींची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील भोई समाजाचा मच्छीमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.
त्यामुळे त्याचा जीव वाचला-
महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील दिनकर महाडिक हे नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी काळ नदीवर गेले होते. त्यावेळी मासेमारी करताना अचानक मगर येत असल्याची चाहूल महाडिक यांना लागली. आपला जीव वाचविण्याच्या दृष्टीने महाडिक पाण्याबाहेर पडू लागले. मात्र मगरीने त्यांच्यावर हल्ला करून पायाला चावा घेतला. महाडिक यांनी त्यातूनही जोर लावून पाण्याबाहेर पळ काढला. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
जीव धोक्यात घालून मासेमारी-
महाडिक यांनी प्रसंगावधान राखून वेळीच पाण्याबाहेर आल्याने जीवावर बेतणारे पायावर निभावले. त्यानंतर महाडिक याना रुग्णालयात दाखल करून उपचारांती घरी सोडण्यात आले. काळ नदीत मगरीची संख्या वाढू लागल्याने मच्छिमार करणाऱ्यांना जीव धोक्यात घालून मासेमारी करावी लागत आहे.
हेही वाचा-ओबीसी समाजातील दोन मंत्र्यांची हकालपट्टी करा; मराठा संघटना राज्यपालांच्या भेटीला