रायगड - कोरोनाच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून याकाळात जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये होम-क्वारंटाईन असतानाही बाहेर फिरणाऱ्या तसेच कोरोनाबाबत अफवा पसरवणारे, मास्क न घालणारे अशा 25 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 11 जण हे होम-क्वारंटाईन असताना बाहेर फिरणारे आहेत. तसेच अवैध दारू विक्री, अवैध वाहतूक, सार्वजनिक गर्दी, हॉटेल, दुकाने, फेरीवाले असे एकूण 84 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.
हेही वाचा...दारूसाठी काय पण! 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
कोरोनाची बाधा नागरिकांना होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन खबरदारी घेत आहेत. कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, बाहेर फिरू नये, होम-क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी बाहेर पडू नये, मास्क लावणे, कोरोनाबाबत अफवा पसरवू नये, यासारख्या सूचना वारंवार नागरिकांना जिल्हा प्रशासन, पोलीस करत असतात. मात्र तरीही नागरिक जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या आवाहनाला दाद देत नाहीत. त्यामुळे अखेर पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा पोलिसांनी 15 मार्चपासून ते 3 एप्रिल संचारबंदी दरम्यान कोरोना संदर्भात दिघी सागरी 09, महाड शहर 1, एमआयडीसी 2, पाली 1, कर्जत 1, नेरळ 1, पेण 1, अलिबाग 1 असे 25 गुन्हे दाखल केले आहेत. संचारबंदीत हॉटेल/ आस्थापना सुरू ठेवल्या संदर्भात कर्जत 1, खोपोली 2 असे 3 गुन्हे, अवैध दारू बाबत मुरुड 1, कोलंड 1, माणगाव 1, श्रीवर्धन 1, पाली 1, नेरळ 2, खोपोली 1, रसायनी 1, वडखळ 1 असे 10 गुन्हे, इतर दुकाने महाड शहर 1, एमआयडीसी 1, खालापूर 1, खोपोली 2, पेण 2 असे 7 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले असून 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...Coroanavirus : सेफ्टी किट नसल्याने मुंबईत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
जिल्ह्यात 144 कलम लागू असताना नागोठणे 1, रोहा 1, माणगाव 1, पाली 2, कर्जत 1, नेरळ 1, खोपोली 2, पेण 5, अलिबाग 2, मांडवा सागरी 1 आणि रेवदंडा 1 असे सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याबाबत 18 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. खाजगी वाहतुकीला बंदी असताना गोरेगाव 2, श्रीवर्धन 1, म्हसळा 1, पोलादपूर 1, महाड शहर 2, पाली 1, खालापूर 1, खोपोली 1, रसायनी 1, पेण 4, वडखळ 1, दादर सागरी 4 असे अवैध वाहतूक करणाऱ्या 18 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर कर्जत आणि नेरळमध्ये प्रत्येकी 1 असे दोन गुन्हे हॉकर्स आणि फेरीवाले यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.