रायगड -राज्यात कोविड लसीचा साठा दीड दिवस पुरेल इतका शिल्लक आहे. रायगड जिल्ह्यातही आज एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात 59 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 35 हजार नागरिकांनी कोविड लस टोचून घेतली आहे. त्यामुळे उद्यापासून जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद राहण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना लस उपलब्ध होईपर्यंत थांबावे लागणार आहे.
लसीकरणाला नागरिकांचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड जिल्ह्यात 16 जानेवारीपासून आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, पोलीस, महसूल, स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना पहिल्या टप्यात कोविड लसीकरण मोहीम देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तर तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिकांनी या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यात ५० हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 35 हजार रायगडकरांनी कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत.