रायगड - घरात कोणी नसल्याचा फायदा घेत शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामुळे हादरलेल्या पीडितेने ही बाब आपल्या आईला सांगितली. मात्र तो चांगला मुलगा असून तू त्याच्यावर आरोप करत असल्याचे आईने पीडितेला ठणकावले. त्यामुळे पोलिसांनी पुढे होत याबाबत तक्रार दाखल केल्याने त्या नराधमाचे पाप उघड झाले. आता 'त्या' नराधमास अलिबाग सत्र न्यायालयाने दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. अवधूत भागणा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना एप्रिल आणि मे २०१४ मध्ये मुरुड तालुक्यातील गावात घडली होती.
शेजाऱ्याचा मुलीवर बलात्कार, पीडितेची आई म्हणाली 'तो' चांगला मुलगा. . आता न्यायालयाने ठोठावली नराधमाला शिक्षा - आई
पीडितेवर अत्याचारानंतरही तिच्याआईने तो चांगला मुलगा असल्याचे तिला सांगितले. त्यामुळे हे प्रकरण थांबले. मात्र याबाबत कुणकुण लागताच पोलिसांनी पुढे होऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या नराधमाच्या पापाची शिक्षा न्यायालयाने त्याला दिली.
पीडित मुलगी तिच्या मामाच्या घरात आईसोबत राहत होती. तर आरोपी हा त्यांच्या घरामागे राहत होता. पीडित मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी अवधूतने जवळीक साधण्यास सुरुवात केली होती. अशातच २०१४ मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात पीडित मुलीच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत तो तिच्या घरात शिरला. तिला घराच्या माळ्यावर नेऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. ही बाब पीडितने तीच्या आईला सांगितली. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तो चांगला मुलगा असून तू खोटे आरोप करू नकोस, असे म्हणत तिलाच गप्प राहण्याचा सल्ला दिला. मात्र पोलिसांच्या ही बाब लक्षात आली. तेव्हा त्यांनी स्वतः प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपी अवधूत विरोधात भादंवी कलम ३७६ आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात झाली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्हि. एम. मोहिते यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील म्हणून अॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात तक्रारदार महिला पोलीस अधिकारी मनिषा जाधव आणि पीडितेची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी वकील बांदिवडेकर- पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. त्यानंतर आरोपी अवधूतला भादंवी कलम ३७६ (२) (आय) आणि पोस्को कायद्यातील कलम ५ (एम), ६ अन्वये दोषी ठरवत दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भादंवी कलम ५०६ अन्वये २ वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडही ठोठावला. पीडितेच्या आईलाही न्यायालयाने पोस्को कायद्यातील तरतुदीनुसार दोषी ठरवत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.