रायगड (पनवेल) - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. आज या नदीवरील पुलावरून मोटारसायकलने प्रवास करणारे दाम्पत्य वाहून गेले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाकडून त्या दाम्पत्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पनवेलमध्ये पावसाचा कहर; गाढी नदीच्या पाण्यात मोटारसायकलसह दाम्पत्य गेले वाहून
मुंबईसह संपूर्ण पनवेल शहरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी नदी परिसरातील अनेक गावात घुसले आहे. नद्या, नाले, दुथडी भरुन वाहत आहेत.
आदित्य हरिश्चंद्र आंब्रे आणि सारिका आदित्य आंब्रे असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. ते निर्मिती गार्डन परिसरात राहत असून त्यांचा डिसेंबर २०१८ मध्ये विवाह झाला होता. हरिश्चंद्र आज पत्नी सारिकासोबत गाढी नदीवरील अरुंद पुलावरून मोटारसायकलने प्रवास करत होते. मात्र, वाढत्या पावसामुळे गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे हे दाम्पत्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले. यावेळी पुलाच्या बांधकामाचा पाय देखील वाहून गेला आहे.
परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्मिशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, दुपारी १२ वाजून देखील त्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला पाचारण करण्यात आले. त्याद्वारे त्या दाम्पत्याचा शोध सुरू आहे.