पनवेल - नगरसेवक जगदीश गायकवाड यांची तीन मुले आणि भाच्याने एका तरुणाच्या डोक्यात चक्क ८ बिअरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. विश्वनाथ गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पनवेल येथील रोडपालीजवळच्या गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर शनिवारी (३ ऑगस्ट) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आम्ही नगरसेवकाची मुले आहोत, त्यामुळे आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करायची हिंमत कशी होते, असे म्हणत पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक गायकवाड यांच्या सिध्दांत, संदेश आणि स्वप्निल या मुलांनी तरुणाला मारहाण केली. या घटनेमुळे कळंबोलीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तेत असलेल्या नगरसेवकाची मुले असून सुद्धा पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची हिंमत या तरुणाने केली. हे नगरसेवक पुत्रांना जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी तक्रारदार तरुणाच्या भावाला एकट्यात गाठले आणि ५ गुंडांच्या मदतीने त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर ८ बियरच्या बाटल्या फोडल्या. विश्वनाथ सध्या आयसीयुमध्ये आहे. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हादरलेले विश्वनाथचे कुटुंबीय आजही नगरसेवक गायकवाड यांच्या दहशतीखाली राहत आहेत. मात्र, तरीही कळंबोलीचे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप पीडिताच्या कुटुंबियांनी केला आहे. या घटनेला ५ दिवस उलटले तरी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे नगरसेवकच्या राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित तरुणाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली असती तर आज आमच्या मुलावर हल्ला करण्याची हिंमत झाली नसती, असे म्हणत पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे जर यावेळी आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू, असा इशारा पीडित कुटुंबियांनी दिला आहे.