रायगड - अष्टविनायक गणपतीपैकी दोन स्थळे ही रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथे आहेत. लाखो भाविक महडच्या वरदविनायक आणि पालीच्या बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. मात्र, सध्या राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट गडद होत चालले असताना अनेक जिल्ह्यात शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे ही कोरोनाचे नियम पाळून खुली ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील महड आणि पाली येथील अष्टविनायक गणेश मंदिरे देखील कोरोनाचे नियम पाळून भाविकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी मंदिर प्रशासनाकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
महड वरदविनायकाचे दर्शन कोरोनाचे नियम पाळून
पाली, महडच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी निर्बंध कडक - corona vaccination news
अष्टविनायक क्षेत्र महड, पाली येथे भक्तांसाठी दर्शनासाठी कडक नियमावली लागू, शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत भक्तांना दिले जाते दर्शन
महड गावातील एक गणपती क्षेत्र म्हणजे श्री वरदविनायकाचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात दैनंदिन असंख्य भाविक दर्शनासाठी येऊन श्री वरदविनायकाचे दर्शन घेत असतात. परंतु कोरोना लॉकडाऊनच्या काळात काही महिने मंदिर बंद ठेवल्याने गणेश भक्त नाराज झाले होते. त्यानंतर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत भक्तांसाठी मंदिराची दारे खुली करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने शासनाच्या वतीने कडक नियम लावण्यात आहेत. महड मंदिरातही भक्तांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक करत दर्शन सुरू ठेवले आहे. यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून वेगळे पथक निर्माण करून भक्तांना सूचना देण्यात येत आहेत.
अष्टविनायकपैकी एक असलेले पाली बल्लाळेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना सॅनिटायझर लावून, तापमान तपासणी करून सुरक्षित अंतर राखून दर्शन दिले जात आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने भक्तांच्या दर्शन रांगेमध्ये एक मीटर अंतरावर बॉक्स तयार केले आहेत. मंदिरात प्रवेश करताना सॅनिटायझर लावून, मास्क लावून आणि तापमान तपासणी करून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात आहेत. कोरोनाच्या नियमाचे पालन करूनच भाविकांना दर्शन दिले जात आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या भक्तांना दर्शन नाही
पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाने नवीन नियमावली काढत दर्शनासाठी कडक नियम लावल्याने अष्टविनायक क्षेत्र महड, पाली मंदिराचे या नियमाचे पालन करित भक्तांना दर्शन देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मंदिर व्यवस्थापन कमिटी चोख बंदोबस्त करीत आहेत. त्यामुळे याठिकाणी दर्शनाला येताना भाविक भक्तांनी नियम पालन करा असे आवाहन मंदिर व्यवस्थापन कमिटीने केले आहे, जर कोणत्या भक्तांनी नियमाचे पालन केले नाही तर दर्शन मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे.