रायगड - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी पोलीस वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. प्रशासनाने वारंवार सुचना देऊनही बाहेर फिरणाऱ्या लोकांची गर्दी जास्त आहे. या पार्श्वभूमीवर आता रायगड पोलिसांनी जो विनाकारण बाहेर फिरताना दिसेल त्याची अँटीजन टेस्ट करण्यात येई असा प्रयोग सुरू केला आहे. विनाकारण फिरणाऱ्या, मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून दंड आकारला जात आहे. मात्र, तरीही विनाकारण बाजारात, रस्त्यावर नागरिक फिरून गर्दी करीत आहेत. अखेर अलिबाग पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसविण्यासाठी ही युक्ती शोधली आहे. या युक्तीमुळे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाहीत. तसेच, कोरोना आटोक्यात येण्यासही मदत होईल. आज बाहेर फिरणाऱ्या सुमारे (102) नागरिकांची अँटीजन तपासणी केली. त्यामध्ये एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना अँटीजन तपासणी, रायगड पोलिसांचा प्रयोग 'तालुक्यात कोरोना अद्यापही आटोक्यात नाही'
रायगड जिल्ह्यात अलिबाग सोडला, तर इतर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. मात्र, अलिबाग तालुक्यात रोज शंभर ते दीडशे नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. मार्च ते (मे 2021) या तीन महिन्यात साधारण पाच हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन महिन्यात दीडशेहून अधिक नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत तालुक्यात 1 हजार 162 कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. अलिबागमधील परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक सर्रास रस्त्यावर फिरतना दिसत आहेत.
'अलिबाग पोलिसांचा नवा प्रयोग'
अलिबाग तालुक्यात कोरोना अद्याप आटोक्यात आलेला नाही. यामध्ये आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांचीही चूक असल्याचे दिसत आहे. पोलीस यंत्रणा कोरोनाच्या अनुषंगाने विनाकारण फिरणाऱ्यांवर रोज कारवाई करत आहे. मात्र, शहरात फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी काही कमी होत नाही. अखेर, पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कोरोना अँटीजन चाचणी करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. अलिबाग शहरातील एसटी स्थानक परिसरात आरोग्य यंत्रणेच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या 102 जणांची आज अँटीजन तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या महिलेस पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुगणालायत दाखल केले आहे. पोलिसांच्या या युक्तीमुळेतरी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गर्दी कमी होण्यास आणि कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.