रायगड - रायगड म्हणजे पूर्वीचा कुलाबा जिल्हा. या मतरदारसंघात १९९५२ ते २००४ पर्यंत काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाचे आलटून पालटून प्राबल्य राहिले होते. २००९ नंतर आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मात्र, एकेकाळी काँग्रेस व शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघात शेकाप व काँग्रेस पक्षाची वाताहत होताना दिसत आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याची नामुष्की या दोन पक्षावर आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस व शेकाप हे लोकसभा निवडणुकिवर पाणी सोडणार अशी वेळ दोन्ही पक्षावर आलेली आहे.
चिंतामण देशमुख कुलाब्याचे पहिले खासदार
१९५२ कुलाबा लोकसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चिंतामण देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शेकापचे उमेदवार राजाराम राऊत यांचा पराभव केला होता. कुलाबा जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून चिंतामण देशमुख यांना मान मिळाला आहे. त्यानंतर १९५७ ला शेकापचे राजाराम राऊत, १९६२ भास्कर दिघे (काँग्रेस),१९६७ दत्तात्रेय कुंटे (शेकाप), १९९७१ शंकर सावंत (काँग्रेस), १९७७ दिनकर पाटील (शेकाप), १९८० अंबाजी पाटील (काँग्रेस आय), १९८४ दिनकर पाटील (शेकाप), १९८९, १९९१, १९९६ बॅ. ए. आर. अंतुले (काँग्रेस आय), १९९८, १९९९ रामशेठ ठाकूर (शेकाप) हे काँग्रेस, शेकापचे ३ उमेदवार कुलाबा लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.
२००४ ला कुलाबाचे नाव बदलून जिल्ह्याला रायगड नाव देण्यात आले. रायगड लोकसभेतून २००४ ला पुन्हा काँग्रेसचे बॅ. एआर अंतुले निवडून आले. २००९ व २०१४ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणला. तर २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला होता.