रायगड - जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने अॅड. श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे दिर राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. अलिबाग, मुरुडमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते हे राजेंद्र ठाकूर यांचा प्रचार करीत आहेत. काँग्रेसने महिला सक्षमीकरणामुळे 1957 मध्ये मनोरमा भिडे यांच्यानंतर 62 वर्षांनी मतदारसंघात दुसऱ्यांदा उच्च शिक्षित अॅड. श्रद्धा ठाकूर यांच्या रूपाने महिला उमेदवार म्हणून संधी दिली आहे. मात्र, काँग्रेस पक्षात बंडखोरी झाल्याने महिला उमेदवार श्रद्धा ठाकूर आणि निरीक्षक म्हणून आलेल्या राज्यसभा सदस्या डॉ. अमीन यागनिक यांना मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन प्रचारात फिरण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा -संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले
अलिबाग विधानसभा मतदारसंघात 1952 पासून फक्त 4 वेळा काँग्रेसचे पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात 1957 साली आणि आता 2019 च्या निवडणुकीत महिलेला काँग्रेसने संधी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र अॅड. प्रवीण ठाकूर, राजेंद्र ठाकूर आणि सून अॅड. श्रद्धा ठाकूर या तिघांनी उमेदवारी काँग्रेसकडे मागितली होती. तर पक्षाने महिला सक्षमीकरणमुळे श्रद्धा ठाकूर यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. त्यामुळे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.