रायगड : मुरुड तालुक्यात 14 गावात येत असलेल्या एमआयडीसीला शेतकरी आणि मच्छीमारनी तीव्र विरोध दर्शविला आहे. 14 गावातील हजारो शेतकरी आणि मच्छीमार यांनी एमआयडीसीला विरोध दर्शविण्यासाठी आज वाघूलवाडी ते तळेखार या नऊ किलोमीटर रस्त्यावर मानवी साखळी तयार केली होती. तर शेकडो तरुणांनी बाईक रॅली काढून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. या निषेध रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप सोडून सर्वपक्षीय नेतेही सामील झाले होते. रॅलीनंतर तळेखार येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
१4 गावाचा एमआयडीसीला तीव्र विरोध..
शासनाने मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग परिसरात नवेनगर औद्योगिक वसाहत वासविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुरुड तालुक्यातील 14 गावे ही या प्रकल्पतून वगळून त्याठिकाणी एमआयडीसी वसविण्याची अधिसूचना काढली. याबाबत 14 गावातील शेतकऱ्यांना नोटीसीही पाठविण्यात आली आहे. 14 गावात कोणता प्रकल्प येणार याबाबत कोणतीच कल्पना येथील शेतकरी, मच्छीमार यांना नाही. एमआयडीसीला 14 गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
गावाच्या वेशीवर शेकडो ग्रामस्थ निषेधासाठी होते उभे..
मुरुड तालुक्यातील वाघूलवाडी ते तळेखार या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गावाबाहेर शेकडो शेतकरी निषेधाचे बॅनर घेऊन उभे होते. यावेळी शेतकऱ्याच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमला होता. या आंदोलनात लहानापासून वृद्धापर्यत ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रामस्था हातात काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध व्यक्त करीत होता.