रायगड -जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक उद्या(3 जानेवारी) पार पडत आहे. राज्यातील नव्या समीकरणामुळे रायगड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे चित्र आहे. मात्र, शिवसेना शेकापविरोधी असल्याने शिवसेनेच्या एका गटाला सत्तेत जाण्याची इच्छा आहे. तर, दुसऱ्या गटाचा मात्र याला विरोध आहे. आपल्या भूमिकेबाबत शिवसेनेच्या दोन गटात असणाऱ्या विरोधाभासामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप अशी आघाडी आहे. जिल्हा परिषदेत शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 11, भाजप 3 तर काँग्रेस 3 असे 59 चे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कमी सदस्य असतानाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष पद दिले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी अडीच वर्षे अध्यक्ष पद भूषवले आहे. यावेळी अध्यक्षपद शेकापच्या वाट्याला येणार आहे.