रायगड- मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली दहा वर्षांपासून रखडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
खासदार सुनील तटकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची केली पाहणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांसोबत खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी तातडीने रस्ते दुरुस्ती करावी, प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे अधिकाऱ्यांना सूचित केले. या दरम्यान त्यांनी महामार्गालगत असलेल्या गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
खासदार सुनील तटकरे यांनी सकाळी पेणपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची माहिती अधिकाऱ्यांकडून घेऊन योग्य त्या सूचना केल्या. महामार्गावरून पुलामार्गे गावात जाणाऱ्या ग्रामस्थांना वाहतूक करण्यास अडचण होते तसेच पुलाला कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता असते. अशा ठिकाणीही लवकरात लवकर काम करण्यास सांगितले. गणेशोत्सव सुरू होण्यास अजून वेळ असला तरी कोकणातील चाकरमानी हा कोरोनामुळे लवकर गावी जाणार असल्याने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याच्या बाबतही तटकरे यांनी सूचना केल्या. पेण ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील रस्त्याची दुरवस्था झाली असून लवकरच हा रस्ता राज्य शासनाच्या मार्फत पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा- नालासोपाऱ्यात 15 मिनिटांत ई-पास देण्यासाठी 1500 रुपये घेणाऱ्या दोघांना अटक