रायगड - सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टुमदार पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित असलेले माथेरान काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष प्रशासकीय घटक म्हणून घोषित केले. गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या माथेरानचे पर्यटन काही अटी शर्तीसह नियमावली जाहीर करून 50 टक्के क्षमतेने सुरू केल्यामुळे खऱ्याअर्थाने येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माथेरानकरांचा उदरनिर्वाह प्रश्न संपुष्टात आला आहे. या अनुषंगाने माथेरान पर्यटन स्थळावर नियमांचे पालन केले जाते का, येथील स्थानिक प्रशासन कशा प्रकारे पर्यटकांची व नागरीकांची काळजी घेते. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कार्यालयीन दौरा न करताच अचानकपणे दि.9 जूलैला माथेरानला भेट दिली.
माथेरानचा घेतला आढावा
यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडून माथेरानकरांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या जाणून घेतल्या. त्यांचे निरसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नक्कीच पाठपुरावा करून काही विषय लवकरच मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. माथेरान नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी तसेच मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्याशी संवाद साधताना येथील शिक्षणाविषयी, प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाबाबत तसेच येथील जल स्त्राोतांवर आधारित 'माथेरान ब्रॅण्ड बिसलेरी प्लान्ट' उभारण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. येथील बि. जे. रुग्णालयाची पाहणी करत कोविड वार्ड, ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग), ऑक्सीजन यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे. याचबरोबर रुग्णालयात कोणत्या सुविधांचा अभाव आहे. याचाही आढावा घेण्यात आला.
यावेळी माथेरानच्या विकासाच्या दृष्टीने पाठपुरावा करणाऱ्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कार्यप्रणालीचे कौतूक करत रायगड जिल्ह्यात माथेरान ही १०० टक्के कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी केलेली पहिली नगरपरीषद लवकरच आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.