रायगड - उरण तालुक्यातील निसर्ग जेवढा भावणारा आहे, तेवढाच भावणारा येथील द्रोणागिरी पर्वत आणि त्यावरील किल्ला आहे. सध्या याठिकाणी असणाऱ्या वास्तू येथील इतिहासाची साक्ष देत आहेत. मात्र या वास्तूंच्या भिंतींवर कोळशाने नावे कोरली आहेत. याद्वारे आपल्या कर्तृत्वाचा बाजार मांडून या वास्तूचे विद्रुपीकरण तरुणाईकडून करण्यात येत असल्याचे चित्र आहे.
इतिहासाची पाने काळी करण्याचे काम -
द्रोणागिरी पर्वताबाबत एक दंतकथा आहे. ती म्हणजे लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर संजीवनी बुटी आणायला गेलेल्या हनुमंताने पूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता. वाटेमध्ये एक तुकडा पडला, तोच हा द्रोणागिरी पर्वत. तर यावर असणारा किल्ला हा हजारो वर्षे आपला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या किल्ल्याची मजबूत तटबंदी येथील पराक्रमाचा इतिहास सांगत आहेत. संपूर्ण द्रोणागिरी पर्वतावर ही तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. यावरून या किल्ल्याची भव्यता आणि त्यावेळची भरभराट लक्षात येते. इ.सन 1530 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर अंतनो दो पोर्तो या पादरीने याठिकाणी एन. एस. द पेन्हा, सॅम फ्रान्सिस्को आणि नोसा सेन्होरा हे तीन चर्च बांधले. सध्या या तीन चर्च पैकी एन. एस. द पेन्हा या चर्चची इमारत आपल्याला येथे पाहायला मिळते. उरलीसुरली तटबंदी, बुरुज आणि ही इमारत आपल्याला येथे इतिहासाची साक्ष देत उभे असल्याचे पाहायला मिळते. अनेक पर्यटक, इतिहास अभ्यासक या किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे अनेक पर्यटकही येथे पर्यटनासाठी येत असतात. मात्र या पर्यटकांकडून येथील वास्तूंच्या भिंतीवर कोळशाने आपल्या प्रेमाचे ओरखाडे ओढून या वास्तूंचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. यामुळे या वास्तूंच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची पाने काळी करण्याचे काम अशा पर्यटकांकडून केले जात असल्याचे दिसत आहे.
विद्रुपीकरणाबाबत संवर्धन संस्थांची नाराजी-
किल्ल्याच्या संवर्धनासाठी काही संस्था पुढे सरसावल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून अनेक वास्तू पुन्हा उकरून काढण्यात आल्या आहेत. तर या वास्तूंच्या संवर्धनाचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या इतिहासाच्या विद्रुपीकरणाबाबत या संस्था नाराजी व्यक्त करत आहेत. तर या किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारी येथे संवर्धन करत असणाऱ्या संस्थांवर शासनाने द्यावी, अशी मागणी "नवपरिवर्तन संस्थेच्या" माध्यमातून करण्यात येत आहे.