रायगड- निसर्ग चक्रीवादळाचा सर्वधिक फटका रायगडमध्ये बसला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 5 जून रोजी रायगड दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी साडेबारा वाजता जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात दौरा करणार असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
आज मुख्यमंत्री रायगडात; निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा करणार दौरा जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यावेळी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळबाबत जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
जिल्ह्यात साधारण पाच लाख घरांची पडझड झाली असून वीज वितरणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वादळग्रस्त गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून अधिक सामानाची आणि कर्मचाऱ्यांची मागणी ऊर्जामंत्री यांच्याकडे केल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. तर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून नागरिकांना विशेष पॅकेज देण्याबाबत विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेकांचे पत्रे उडाले असून बाजारात पत्र्याची कमतरता असली तरी ते उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आलेले आहे.