रायगड- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी ६०० कोटी रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. मात्र, 5 वर्षांत भाजप सरकारने यापैकी फक्त ६० कोटी निधी दिला होता. मात्र, आता महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताच रायगड किल्ला संवर्धनासाठी २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे रायगड किल्यावर रखडलेली कामांना आता गती मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य राजधानी रायगड किल्ल्यास निधी मंजूर केल्याने समस्त शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आभार मानले. तसेच आनंदाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित निधीही लवकरात लवकर मिळावा, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला पसंती दिली होती. रायगड किल्ल्यावरून महाराजांनी स्वराज्याचा गाडा सांभाळला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड किल्ला हा शिवभक्तांचे आराद्य दैवत आहे. रायगड किल्ल्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी 2014 मध्ये राज्य सरकारने रायगड प्राधिकरण स्थापन करून किल्ला संवर्धनाचे काम हाती घेतले. या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे असून त्यांच्या देखरेकीखाली रायगड किल्ला संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी फडणवीस सरकारने ६०० कोटी रुपये मंजूर केले. प्राधिकारणातून रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०० कोटी निधीपैकी फक्त ६० कोटी निधी पाच वर्षात राज्य सरकारने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे वर्ग केले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाकडून एक रुपयाचाही निधी वर्ग केलेला नव्हता. त्यामुळे अनेक कामे ही निधी अभावी रखडलेली होती.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रायगड किल्ला संवर्धन कामासाठी २० कोटी निधी कॅबिनेट बैठकीत मंजूर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड किल्ला संवर्धन कामासाठी दिलेल्या निधीमुळे रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. आगामी काळातही रायगड किल्ला संवर्धन कामासाठी लवकर निधी मिळण्याची आशा शिवभक्त आणि शिवसैनिकामध्ये निर्माण झालेली आहे.