रायगड -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील अष्टविनायक पैकी दोन असलेले महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर तसेच इमॅजिका वॉटर पार्क आणि घारापुरी लेणी याठिकाणी 31 मार्च 2020 पर्यत खबरदारी म्हणून नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतासह महाराष्ट्रातही या विषाणूचे बाधित रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात कामोठे येथे एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. तर दुबई येथून आलेल्या 20 जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
कोरोना इफेक्ट: रायगड जिल्ह्यातील महड, पाली, घारापुरी, इमॅजिका वॉटर पार्कवर जाण्यास नागरिकांना बंदी हेही वाचा -रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क
जिल्ह्यातील महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर ही धार्मिक स्थळे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येत असतात तर खालापूर येथे इमॅजिका वॉटर पार्क आणि उरण घारापुरी येथे प्रसिद्ध लेणी आहेत. या पर्यटन स्थळालाही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता असल्याने 31 मार्च पर्यत याठिकाणी नागरिकांना प्रवेश बंदी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केली आहे.
हेही वाचा -धुलिवंदन सणावर 'कोरोना' विषाणूची दहशत; समुद्र किनारी पर्यटकांची तुरळक गर्दी