रायगड - पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विषय सध्या वादात अडकला आहे. या हद्दीमुळे पोलीस कर्मचारी आणि नागरिक दोघांनाही अडचण होत असल्याचे सांगितले जात आहे. तळोजा परिसरातील नागरिकांना १५ किलोमीटर पायपीट करुन पनवेल ठाणे गाठावे लागत आहे. त्यामुळे तळोजातील सात गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
पनवेल तालुक्यामध्ये सात पोलीस ठाणी आहेत. यातील पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरालगतच्या गावांचा समावेश होतो. मात्र, ही बाब पोलिसांसह तक्रारदारांना त्रासदायक ठरते. पूर्वी शहराचे आकारमान छोटे होते. शहरातून बाहेर पडण्यासाठी फार तर १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागायचा. पण, आता तळोजा मध्ये काही गुन्हा घडल्यास त्याची तक्रार नोंदवण्यासाठी एक ते दीड तासाचा कालावधी खर्ची करून पनवेल तालुका पोलीस स्टेशन गाठव लागते. तालुका पोलील ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनादेखील याच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत कर्मचारी बोलून दाखवतात.
२००७ पर्यंत ग्रामीण हद्द रायगड पोलिसांकडे होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली हा परिसर होता. परंतु, त्यानंतर हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकाराखाली जोडण्यात आला. २०१३ मध्ये खांदेश्वर, कामोठे हे दोन नवीन पोलीस ठाणे झाले. त्यामुळे पूर्वीच्या पनवेल शहर आणि कळंबोली पोलीस ठाण्याची हद्द विभागली गेली. परंतु पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे इतकेच राहिले. खालापूर, पेण आणि ठाणे हद्दीपर्यंत या पोलिसांची सीमा आहे.
कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच तळोजा पोलीस स्टेशन असताना तळोजातील नागरिकांना केवळ हद्दीच्या विषयापायी इतका मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे.
यासंदर्भात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर रणवरे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनना पत्र दिले आहे.