रायगड - चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच रायगडच्या श्रीवर्धन समुद्रात एक चिनी जहाज गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. चिनी जहाज रत्नागिरी समुद्रामार्गे श्रीवर्धनकडे येत असताना गायब झाले आहे. या बेपत्ता जहाजाबाबत तटरक्षक दलाने मात्र चिडीचूप भूमिका घेतली असल्याने जहाजाबाबत आता गूढ वाढू लागले आहे. जिल्हा पोलीस दलाला या जहाजाची माहिती मिळाली असता त्यांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही अपयश आले आहे. त्यामुळे चिनी जहाज श्रीवर्धन समुद्रात कुठे गायब झाले? हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.
अरबी समुद्रात रत्नागिरी येथून मंगळवारी रात्री एचवाय 5 हे चिनी जहाज श्रीवर्धनकडे निघाले होते. हे चिनी जहाज श्रीवर्धनकडे येत असल्याची माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस दल हे सतर्क झाले होते. सागरी किनारपट्टी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. पोलिसांनी श्रीवर्धन समुद्रकिनारी दुर्बिणीच्या साहाय्याने चिनी जहाजाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, चिनी जहाजाचा शोध लागला नाही. तरीही समुद्रकिनारे, खाडी, जेट्टी परिसरात पोलिसांनी गस्त वाढवली होती.
रायगडच्या समुद्रात चीनचे जहाज गायब, यंत्रणा सतर्क - रायगड समुद्रात चिनी जहाज गायब
रायगडच्या श्रीवर्धन समुद्रात एक चिनी जहाज गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. चिनी जहाज रत्नागिरी समुद्रामार्गे श्रीवर्धनकडे येत असताना गायब झाले आहे. या बेपत्ता जहाजाबाबत तटरक्षक दलाने मात्र चिडीचूप भूमिका घेतली असल्याने जहाजाबाबत आता गूढ वाढले आहे.
चिनी सैनिकांनी आधीच भारताच्या सीमेवर कुरखोडी सुरू केली असून, यामध्ये भारताचे २० जवान हे हुतात्मा झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच रायगडमध्ये आलेले हे चिनी जहाज कशासाठी आले आहे, ते मालवाहू आहे की समुद्रमार्गे कारवाई करण्यासाठी पाठविलेले जहाज आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. रत्नागिरी येथून निघालेल्या जहाजाची पक्की माहिती असताना ते श्रीवर्धन समुद्रात अचानक गायब कुठे झाले, याबाबत गूढ वाढले आहे. मुरुड येथील तटरक्षक दलाचे कमांडर अरुणकुमार यांना चिनी जहाजाबाबत विचारणा केली असता, याबाबत आपल्याला ज्याच्याकडून माहिती मिळाली त्याच्याकडून माहिती घ्या, असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
आम्हाला रत्नागिरी येथून श्रीवर्धन समुद्रातून एक अनोळखी चिनी जहाज जाणार असल्याची माहिती नेव्हीकडून मिळाली होती. त्यानुसार आम्ही आमची यंत्रणा सतर्क केली होती. समुद्रात ठराविक हद्दीपर्यंत जाण्याची परवानगी असल्याने तेथून दुर्बिणीच्या साहाय्याने जहाजचा शोध घेण्यात आला. मात्र, समुद्रात एक जेएसडब्लू आणि दुसरे तटरक्षक दलाचे जहाज आम्हाला दिसले. मात्र, चिनी जहाज आम्हाला समुद्रात दिसले नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितले.