महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपल्याला कोरोनाशी लढायचंय, रुग्णांशी नव्हे, चौल ग्रामपंचायतीचा आदर्श घ्या.. - good care of corona suspected patients chaul

चौल ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आपल्या माणसांचे ग्रामपंचायत स्वागत करीत असून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने गृह विलगीकरण करून राहण्याची, आरोग्याची काळजी घेत आहेत. चौल ग्रामपंचायतीने कोरोना संकटकाळात उचललेले हे पाऊल इतर गावांसाठी आदर्शयुक्त ठरत आहे.

चौल ग्रामपंचायत
चौल ग्रामपंचायत

By

Published : May 17, 2020, 6:05 PM IST

रायगड - मुंबईतून चाकरमानी हा पूर्वी गावी आला की गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार हे आवर्जून त्याची विचारपूस करीत असे. पण कोरोनाच्या या संकट काळात हाच चाकरमानी आता आपल्याच गावकऱ्यांना, नातेवाईक, मित्रपरिवार यांना नकोसा झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे आज गावात येणाऱ्या चाकरमान्यांना आपल्याच गावात येण्यास बंदी घातली जात आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का', अशी झाली आहे. मात्र, याला अपवाद ठरली आहे ती अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत.

चौल ग्रामपंचायतीचा आदर्श

चौल ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आपल्या माणसांचे ग्रामपंचायत स्वागत करीत असून त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने गृह विलगीकरण करून राहण्याची, आरोग्याची काळजी घेत आहेत. चौल ग्रामपंचायतीने कोरोना संकटकाळात उचललेले हे पाऊल इतर गावांसाठी आदर्शयुक्त ठरत आहे.

कोरोनाचे संकट हे सगळीकडे पसरले आहे. मुंबईकरांना या विषाणूची झळ ही दिवसेंदिवस जास्तच पोहचत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रायगड जिल्ह्यातील चाकरमानी हे आता पुन्हा गावात येऊ लागले आहेत. वाहतूक सेवा बंद असल्याने अनेक चाकरमानी पायी चालत येत आहेत. ज्याची परिस्थिती चांगली आहे, असे खासगी वाहन करून आपले गाव गाठत आहेत. मात्र, गावी आल्यानंतर त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात सगळीकडे सध्या चाकरमानी आणि ग्रामस्थ असा संघर्ष नेहमी पाहायला मिळत आहे. तर स्वतःचे नातेवाईकही आपल्या माणसाला कुटुंबात घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे चाकरमानी नागरिकांचे गावात आल्यानंतरही हाल होत आहेत.

चौल जिल्हा परिषद गटाचे राजीप सदस्य आणि विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी चौल ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, आरोग्य आणि पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन कोरोनाच्या संकटकाळात आपल्या लोकांच्या पाठी उभे राहणे गरजेचे आहे, असे पटवून दिले. त्यानंतर सर्वांनी मिळून येणाऱ्या चाकरमानी यांचे स्वागत करून त्यांना जिल्हा परिषद शाळेत आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने विलगीकरण कक्षात ठेवण्यास सुरुवात केली. आजच्या घडीला चौल ग्रामपंचायत हद्दीत तीनशेहून अधिक चाकरमानी गावी आले असून त्यांना शाळेत, स्वतःच्या घरी विलगीकरण केले आहे.

जिल्हा परिषद शाळेत बनविण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात येणाऱ्या चाकरमानी नागरिकांच्या राहण्याची, झोपण्याची, स्वछतागृहाची सुविधा केली गेली आहे. तसेच गृह विलगीकरणातील व्यक्तीची रोज तपासणी आरोग्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जात असते. विलगीकरण कक्षात ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, प्रशासन कर्मचारी हे आपुलकीने विलगीकरणात असलेल्यांची चौकशी करीत असतात. त्यामुळे गृह विलगीकरणात असलेल्या चाकरमानी यांनाही हायसे वाटत आहे.

गृह विलगीकरणात उत्तम सुविधा चौल ग्रामपंचायतीने केली आहे. त्यामुळे आमचे हे दिवस चांगले गेले. गावातील नागरिकांनी विरोध केला असला तरी या कोरोनाच्या संकटकाळात चौल ग्रामपंचायत आमच्या पाठीशी ठाम उभी राहिल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे मत विलगीकरणातून निघालेल्या रश्मी पाटील, रमेश पाटील, शंकर भोस्तेकर, सुशांत म्हात्रे या नागरिकांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटकाळात येणाऱ्या आपल्या चाकरमानी नागरिकांना प्रेमाचा, आपुलकीचा हात पुढे केल्यास कोरोनामुळे निर्माण झालेली समाजामधील माणुसकीची दरी मिटू शकते. चौल ग्रामपंचायतीने आपल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तसाच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही आपुलकीचा हात या चाकरमान्यांसाठी पुढे केल्यास कोरोनापासून दुरावत चाललेली नात्यातील दुरावा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details