रायगड - रोहा तांबडी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती केली आहे. अॅड. उज्वल निकम यांनी आज(सोमवार) अलिबाग जिल्हा न्यायालयात तांबडी हत्या प्रकरणात हजेरी लावली होती. आरोपींवर दोषारोप सिद्ध करण्याबाबतची कागदपत्रे नमुना 26 ऑक्टोबर रोजी खटल्यावेळी अॅड. उज्वल निकम सादर करणार आहेत. अॅड. निकम यांनी रोहा तांबडी येथे जाऊन गुन्हा घडला त्या ठिकाणची स्थळ पाहणीही केली. त्यामुळे लवकरच या खटल्याची सुनावणी विशेष पोक्सो न्यायालयात सुरू होणार आहे.
रोहा तांबडी येथे 26 जुलै रोजी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रायगडसह महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. प्रकरण घडल्यानंतर रोहा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून चोवीस तासात अटकही केली. तांबडी प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी शासनाला विनंती केली होती. त्यानुसार शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.