रायगड- महाबळेश्वर ते पोलादपूर पर्यंतच्या आंबेनळी घाटातील रस्ता सुरक्षित करण्यासह दरीकडील बाजूला गुरे देखील जाऊ शकणार नाही, अशा पध्दतीचे इंच-इंच जवळ राहणारे गुजरात पध्दतीचे क्रॅश बेअरर्स बसवून घाटातील रस्ता सुरक्षित करावा, असे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आंबेनळी घाटात गुजरात पध्दतीचे क्रॅशबेअरर्स बसवा; चंद्रकांत पाटलांची अधिकाऱ्यांना सूचना - Mahabaleshwar
आंबेनळी घाटात अपघाताचे प्रमाण वाढल्याने हा घाट धोकादायक झाला आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात घट होण्यासाठी गुजरात पध्दतीचे क्रॅश बेअरर्स बसवल्यास महाबळेश्वर ते पोलादपूर या मार्गावरील प्रवास सुरक्षित होऊ शकतो, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
चंद्रकांत पाटील पोलादपूर तालुक्यातील महाळुंगे येथे एका स्नेह्याकडे कौटूंबिक कार्यक्रमासाठी आले होते. यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित केली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सीएसआर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून सर्वात सुरक्षित घाट असा आंबेनळी घाटाचा उल्लेख करावा, यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका पाटील यांनी व्यक्त केली.
पोलादपूर तालुक्यातील महाळुंगे रस्त्यासंदर्भात कोणत्या प्रकारे तरतूद करता येईल, याबाबत चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते प्रत्येक गांववाडीवर एक हजार लोकसंख्येच्या अटीमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सहभागी होऊ शकत नसल्यास, ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ग्रामीण रस्ते दुरूस्तीसाठी तातडीने निधी दिल्यास कामे सुरू करता येतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यानंतर ते कशेडी घाटामार्गे चिपळूण येथील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.