रायगड - प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील 24 तासांत समुद्रकिनारपट्टीवर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना मासेमारीला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने उद्या (सोमवार) मतदानावर पावसाचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी पाऊस अद्यापही जाण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांना आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने केले आहे.