रायगड - भारत हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी आता ही ओळख पुसत चालली आहे. चूल आणि मूल सांभाळणारी महिला आज दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी शामसुंदर पाटील यांनीसुद्धा बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटविला असून महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इटीव्ही भारतने या दामिनीची घेतलेली खास मुलाखत.
मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली आणि मुलीही आपल्या पायावर उभ्या राहण्यास सुरुवात झाली. देशातील सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान ही पदेही महिलांनी भूषविली आहेत. आज महिलाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामे करताना दिसत आहेत. उच्च पदस्थ स्थानावर महिला काम करत असून आपल्या सहकाऱ्यांनाही सोबत घेऊन संस्थेला पुढे नेत आहेत. अलिबागमधील आदर्श पतसंस्था ही चेअरमन सुरेश पाटील आणि संचालक मंडळांनी 21 वर्षांपूर्वी स्थापित केली. यावेळी मीनाक्षी पाटील ह्या मॅनेजर पदावर रुजू झाल्या. दोन कर्मचाऱ्यांच्या सोबतीने पाटील यांनी काम सुरू केले. मीनाक्षी पाटील यांचे उत्तम नेतृत्व, चिकाटी, ग्राहकांचे हीत यासह कर्मचाऱ्यांची आई बनून पतसंस्थाचे छोट्या रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वृक्षात करण्यात पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. पतसंस्थेच्या स्थापनेपासून रुजू झालेल्या मीनाक्षी पाटील आज या वटवृक्ष झालेल्या पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत.
दोन कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेली ही पतसंस्था 21 वर्षे पूर्ण करीत असून तिच्या अकरा शाखेत शंभर कर्मचारी काम करत आहेत. आदर्श पतसंस्थेचा व्यवसाय 300 पर्यंत गेला आहे. तर, या पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. मीनाक्षी पाटील ह्या मॅनेजर पदापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर गेल्या असून पतसंस्थेच्या प्रशासनासह 11 शाखांवर नियंत्रण ठेवत आहेत.