रायगड- चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक मंगळवारी रायगड जिल्ह्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांना हे पथक भेटी देणार आहे. राज्य शासनाचे मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते यांचे दौरे हे वादळाच्या दुसऱ्या दिवसानंतर सुरू झाले. मात्र, केंद्रीय पथक हे पंधरा दिवसांनी जिल्ह्यात पाहणीसाठी येत आहे.
3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक रायगड जिल्ह्यात उद्या येणार आहे.
असा असणार दौरा -
मंगळवार 16 जून रोजी सकाळी 9 वाजता भाऊचा धक्का, मुंबईकडे प्रयाण. सकाळी सव्वा नऊ वाजता भाऊचा धक्का, मुंबई येथे आगमन व रो-रो बोटीने मांडवा जेट्टी, रायगडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता मांडवा जेट्टी येथे आगमन व मोटारीने नागावकडे प्रयाण. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी नागाव येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सकाळी सव्वा अकरा वाजता चौल येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 12.20 वाजता काशिद ता. मुरुड येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 1.10 वाजता मुरुड येथे आगमन. दुपारी 1.10 ते 2.00 जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे सादरीकरण व राखीव मुरुड. दुपारी 2.00 वाजता दिवेआगर, ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता दिवेआगर येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 4.00 वाजता तुरुंबडी येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायंकाळी 4.45 वाजता खरसई येथे आगमन व नुकसानग्रस्त भागाची पाहणी. सायंकाळी 5.15 वाजता महाड, जि.रायगकडे प्रयाण. सायंकाळी 6.45 वाजता महाड येथे आगमन व मुक्काम, असा या केंद्रीय पथकाचा दौरा राहणार आहे.
पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तो अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे, आता केंद्राकडून कोकणासाठी आणि नुकसानग्रस्त भागासाठी किती निधी प्राप्त होणार, याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.