रायगड :केंद्रीय आंतर मंत्रालय पथकाने आज (मंगळवार) रायगडमधील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. चौल, आग्राव या ठिकाणच्या नारळ फोफळीच्या बागांमध्ये जाऊन पथकाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी सुपारी, जायफळ, काळीमिरी, नारळ याबाबत बागायतदार शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचबरोबर नागरिकांची घरे, शासकीय शाळा, समुद्रकिनारी भागात जाऊनही पथकाने नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर हा अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार असून त्यानंतर रायगडसाठी नुकसान भरपाई निधी मिळण्याची शक्यता आहे.
बागायतदार शेतकऱ्यांनी यावर्षी सुपारी उत्पन्न भरघोस होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाने हाताशी आलेले उत्पन्न वाया गेले असल्याची खंत अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यानंतर हे पथक मुरुड, श्रीवर्धनकडे रवाना झाले आणि त्या ठिकाणची देखील पाहणी केली. उद्या हे पथक रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
केंद्रीय पथकाकडून रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी हेही वाचा...'कोकणातील शेतकरी उभा करायचा असेल तर दहापट मदत करावी लागेल'
केंद्रीय पथक अलिबाग येथे दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आक्षी, नागाव सताड वंदर येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती घेतली. चौल येथे काटकर आळी येथील नुकसानग्रस्त बागायतदार यांच्या बागायतीची पाहणी केली. यावेळी बागायतदार यांच्याकडून सुपारी, जायफळ, नारळ या पिकाची माहिती घेतली.
लवकरात लवकर मदत मिळावी ही अपेक्षा : रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले असून बागायतदार शेतकरी कोलमडून गेला आहे. बागायतदार शेतकऱ्याला आता पुन्हा पहिल्यासारखे उभे राहण्यास दहा वर्षे लागणार आहेत. तेव्हा आज आलेल्या केंद्रीय पथकाने जेव्हा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीची संपुर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे केंद्राने नुकसानग्रस्तांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी सुरेंद्र म्हात्रे यांनी केली आहे.
केंद्राकडून आलेल्या पथकात प्रशासन आणि सीबीटीचे सहसचिव रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालय (खर्चाचे) सल्लागार आर. बी. कौल, ऊर्जा मंत्रालयाचे संचालक एल.आर.एल.के.प्रसाद, ग्रामीण विकासाचे उपसचिव एस. एन. मोदी, कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, रस्ते वाहतुक व महामार्गचे मुख्य अभियंता अंशुमली श्रीवास्तव या सहा जणांचा समावेश होता. तसेच या केंद्रीय पथकासोबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे पाहणी दरम्यान उपस्थित होते.