रायगड- म्हसाळा येथे तिहेरी तलाक विरोधी तक्रार नोंद झाल्याची घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने दुसरा विवाह करण्यासाठी तोंडी तीनवेळा तलाक म्हणत पत्नी आणि दोन मुलांना सोडून दिले.
म्हसळा शहरातील साजीद सगीर इनामदार या तरुणाने २५ ऑक्टोंबर २०१३ ला पीडितेशी लग्न केले होते. मात्र, म्हसळा शहरात राहणाऱ्या साजीद इनामदार याचा दुबई येथे व्यवसाय असून तो म्हसळ्यामध्ये ये-जा करत असल्याने त्याचा एका दुसऱ्या तरुणीशी प्रेमसबंध जुळले. प्रेम संबध जुळलेल्या या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने ३१ ऑक्टोंबर २०१९ला आपल्या पत्नीला तोंडी तीनवेळा तलाक बोलून दोन चिमुकल्या मुलांसह सोडून दिल्याचा प्रकार घडला. साजीद इनामदारने आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजता दुसरा विवाह केला. आरोपी साजीद इनामदारला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे म्हसळा शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी केली आहे.