रायगड -रोहा तालुक्यातील 17 गावात येणाऱ्या बल्क औषध निर्मित प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांचा विरोध असूनही तो प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड महेश मोहिते यांनी केला आहे. भाजपा पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे. शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी 3 जुलै रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शेतकरी भेट घेणार आहेत. केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांनाही प्रकल्पाबाबत भेटणार असल्याचे अॅड महेश मोहिते यांनी सांगितले आहे. मुरुड रोहात येणाऱ्या बल्क औषध निर्मित प्रकल्पाला शेतकऱ्यांचा पूर्वीपासून विरोध आहे. भाजपाने याबाबत पुढाकार घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असल्याचे महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रोहा तालुक्यातील 17 गावात बल्क औषध निर्मित प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरे, शासकीय इमारती, शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी संपादित होणार आहेत. मुरुड, रोहा तालुक्यातील या गावात शेतीसोबत फळशेती आणि मासेमारीही केली जाते. शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला पूर्वीपासून विरोध दर्शविला आहे. यासाठी आंदोलने, रॅली काढून आपला निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्प नको असतानाही जमीन संपादनाच्या नोटीसी पाठविल्या असून त्यालाही शेतकऱ्यांनी हरकत नोंदवली असल्याची माहिती यावेळी महेश मोहिते यांनी दिली आहे.
'भाजपा शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रकल्पाबाबत भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक वातावरण असल्याचे भासवले आहे. त्यानंतर उद्योग मंत्री, रायगडचे खासदार, आमदार याची बैठक घेऊन हा प्रकल्प शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आधी शेतकऱ्यांच्या पाठीशी होते, मात्र आता त्यांनीही प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. त्यामुळे भाजपा शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार आहे, असे महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
'3 जुलै रोजी घेणार राज्यपालांची भेट'