रायगड- काही वर्षापूर्वी विदर्भात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीने गंडवल्याची घटना घडली होती. आता रायगडात निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या बागायतदारांकडून मिळणाऱ्या इन्शुरन्स भरपाईमध्ये ओरियंट इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी आपला हात गरम करण्यासाठी सरसावले आहेत. याबाबत श्रीवर्धन येथील बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. निसर्ग चक्रीवादळात ओरियंट कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न करत असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
श्रीवर्धनमधील बागायत शेतकरी यांनी ओरियंट इन्शुरन्स कंपनीकडून काढलेल्या विम्यातून मिळणाऱ्या रक्कमेत आपला हिस्सा मागत असल्याची तक्रार माझ्याकडे केली असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. याबाबत उद्या 27 जून रोजी होणाऱ्या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ओरियट इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले असून लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळात नागरिकांच्या घरासह नारळ फोफळीचे बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. श्रीवर्धनमधील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बागायतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी ओरियंट इन्शुरन्स कंपनीकडून आपली विमा पॉलिसी काढली आहे. निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील बागायतदार हा पूर्णतः कोलमडून गेला आहे. असे असताना ओरियंट इन्शुरन्स कंपनीकडून काढलेल्या आपल्या विम्याची रक्कम नुकसान भरपाई म्हणून कंपनीकडून मिळेल अशी आशा शेतकरी, बागायतदार यांना लागली आहे. मात्र, कंपनीचे अधिकारी हे शेतकऱ्यांकडे जाऊन आपणास अमुक रक्कम मिळणार असून त्यातून अमुक रक्कम आम्हास द्या, असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे एकीकडे बागायतदार हा वादळाने हवालदिल झाला असताना ओरियंट इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी लाचेची मागणी करत असल्याने बागायतदार, शेतकरी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
केंद्राचे रायगडाकडे दुर्लक्ष - सुनील तटकरे
राज्य सरकारने कोरोना संकट असताना पावणे चारशे कोटी मदत त्वरित रायगडसाठी दिली. मात्र, केंद्रांना अद्यापही एक रुपयाही आलेला नाही. आसाम, बंगालमध्ये केंद्रीय पथक न जाता त्याठिकाणी मदत दिली जाते. निसर्ग चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सहकार्य केले जाईल, असे सांगितले होते. मात्र रायगडकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.