रायगड -अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका मिठाई दुकानदाराला कारवाईची भीती दाखवून सुकामेवा घेऊन जाणाऱ्या चौकडीला जेलची हवा खावी लागली. विशेष म्हणजे या चौकडीमध्ये रायगड जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागातील दोन आरोग्य अधिकाऱ्यांचा आणि एका सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षकांचाही समावेश असल्याने आरोग्य विभागाची अभ्रू वेशीवर टांगली आहे.
बोगस एफडीए अधिकारी बनून घातला बनावट छापा रायगड जिल्हा परिषद मधील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश घालवाडकर (46), अलिबाग तालुक्यातील पेंढाबे येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संदीप देठे (26), सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक भगवान म्हात्रे (61) आणि राजकुमार बिराजदार या चौघांवर कामोठे पोलीस ठाण्यात फसवणूक आणि पदाचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. शैलेश घालवाडकर, डॉ संदीप देठे आणि राजकुमार बिराजदार हे चौघे रविवारी कामोठे सेक्टर 21 येथील बालाजी स्वीट या मिठाईच्या दुकानात गेले. दुकानाचे मालक गणेश चौधरी याना आम्ही अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या दुकानातील साहित्य उघड्यावर असून खाद्यपदार्थाची काळजी घेतली जात नाही. असे सांगून तुमचा परवाना जप्त करतो अशी धमकी दिली. चौकडीने दुकान मालक चौधरी यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. त्यावेळी दुकान मालक यांनी पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी या चौकडीने दुकानातील सुका मेवाची पाकिटे घेऊन बाहेर पडले.
चौघेही बाहेर पडताना चौधरी यांना एक फोन वरून आलेल्या व्यक्ती बोगस असल्याचे कळले. त्यानंतर चौधरी यांनी चौघांना अडवून कामोठे पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस आल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आल्यानंतर आपल्या पदाचा गैरवापर करून फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा चौघांविरोधात दाखल केला आहे.