रायगड - महावितरणने ग्राहकांना पाच महिन्यांचे एकत्रित भरमसाठ वीजबिल पाठवले आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या भरमसाठ वीजबिलांबाबत भाजपाने अलिबाग विभागीय कार्यलयासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीजबिलांची होळी करून महावितरण आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच वीजबिले सरसकट माफ न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरणचे अलिबाग सहाय्यक कार्यकारी अभियंता डी बी चिपरीकर यांना दिले आहे.
अलिबागेत भाजपाने विजबिलांची केली होळी; वीजबिले माफ न केल्यास आंदोलनाचा इशारा - अलिबाग भाजपा आंदोलन
कोरोना संकटकाळात महावितरणने ग्राहकाच्या मीटरचे रीडिंग घेतले नव्हते. त्यानंतर जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ झाल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महिनाभर वीजच नव्हती. ऑगस्ट महिन्यात महावितरणने मीटर रीडिंग घेऊन ग्राहकांना पाच महिन्यांचे एकत्रित बिल दिले आहे. हे वीजबिल योग्य असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
अलिबागेत भाजपने विजबिलाची केली होळी
मीटर रीडिंग घेतले नसताना भरमसाठ बिले कशी दिली? असा प्रश्न ग्राहक विचारीत आहेत. याबाबत महावितरण कार्यालयात ग्राहकांचे रोज कर्मचाऱ्यांशी खटके उडत आहेत. याबाबत भाजपाने अलिबाग येथील विभागीय कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन केले. महावितरणचे अलिबाग येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता डी बी चिपरिकर यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष हेमंत दांडेकर, तालुकाप्रमुख परशुराम म्हात्रे उपस्थित होते.