निवडणूक प्रतिज्ञापत्रात जमीन खरेदीची माहिती लपवली; किरीट सोमैय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप - ठाकरे कुटुंब नाईक कुटुंब संबंध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे सहा वर्षांपूर्वी जागा खरेदी केली आहे. सदर जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये 30 सातबाऱ्याचा उल्लेख आहे. तर किरीट सोमैय्या यांनी 40 उतारे असून 10 जागेचा उल्लेख दाखविला नाही, असा आरोप केला आहे.
रायगड
रायगड- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे घेतलेल्या जागेबाबत जनतेला स्पष्टीकरण द्यावे. निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रामध्ये जमिनीची माहिती लपवली आहे. त्यांनी अन्वय नाईक यांच्या घनिष्ठ संबंध आहेत, हे जाहीर करावे, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केली आहे. अलिबाग येथे अॅड. महेश मोहिते यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे घराणे हे बिल्डर घराणे झाले आहे, असा आरोप केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथे सहा वर्षांपूर्वी जागा खरेदी केली आहे. सदर जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकी निवडणूक लढविताना प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केला आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये 30 सातबाऱ्याचा उल्लेख आहे. तर किरीट सोमैय्या यांनी 40 उतारे असून 10 जागेचा उल्लेख दाखविला नाही, असा आरोप केला आहे.
जागेवर सहा वर्षात काहीच काम नाही
उद्धव ठाकरे यांनी कोर्लई येथे घेतलेल्या जागेत सहा वर्षात काहीच बांधकाम केलेले नाही. त्यामुळे ही जागा कशासाठी घेतली आहे. जागा घेण्यातबाबत प्रयोजन काय असा सवालही सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने त्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, असे सोमैय्या यांचे म्हणणे आहे.
ठाकरे घराणे बिल्डरशाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कुठल्याही बँकेत साधे खाते नव्हते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जागा खरेदी करीत असून बांधकाम व्यावसायिक झाले आहेत. अनेक बिल्डरांसोबत त्यांची भागिदारी आहे. त्यामुळे ठाकरे घराण्याचा नक्की व्यवसाय काय आहे?. ठाकरे घराणे हे बिल्डरशाहीकडे चालले आहे का? असा आरोप सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
अन्वय नाईक कुटुंबाशी घनिष्ठ संबंध
उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक याचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे जनतेसमोर ठाकरे यांनी नाईक परिवाराशी घनिष्ठ संबंध असल्याचे जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे.