रायगड -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरुडमधील कोर्लई गावात खरेदी केलेल्या जमिनीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी 7 दिवसात एफआयआर दाखल झाला नाहीतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. शिवाय एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट दिली. गैरव्यवहार प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.
3 मार्च रोजी दाखल केली होती 402 पानी तक्रार
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांच्या नावे 9 एकर जमीन खरेदी केलेली आहे. या जमिनीत आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. याबाबत 3 मार्च 2021 रोजी किरीट सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या विरोधात 402 पानी तक्रार दाखल केली होती. यावेळी सात दिवसात एफआयआर दाखल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते.
रेवदंडा पोलिसांनी सात दिवसात एफआयआर दाखल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता पोलीस याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.