रायगड - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा... श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ : काका-पुतण्यांच्या अस्मितेच्या लढाईत कोण मारणार बाजी ?
पनवेल हा शेतकरी कामगार पक्षाचा गड समजला जात असे. मात्र गेल्या दीड दशकांचा विचार केला, तर इथे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मिश्र लोकवस्तीचे ठिकाण म्हणून पनवेलकडे पाहिले जाते. हा शहरीबहुल परिसर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी 2009 आणि 2014 साली या मतदारसंघात झुंज दिली. एकंदरीत मागील दोनही निवडणुकीत ठाकूर विरुध्द पाटील अशी चुरशीची लढत पनवेलकरांना अनुभवायला मिळाली आहे. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत शेकापच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नसला, तरी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये तयारीला सुरवात केली आहे.