रायगड- लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात पराभव पत्कारावा लागला होता. मात्र युतीने विरोधकांना मताधिक्यात रोखले. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी भगवा फडकेल असे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना व भाजपकडून आमदारकीसाठी दावेदारी सुरू झाली आहे. याबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून सोशल मीडियावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांची सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पडघम वाजायला सुरुवात झाली. त्यानुसार अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना व भाजप दोघेही पक्षाची बांधणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेंद्र दळवी हे बारा हजार मताने या मतदारसंघातून पराभूत झाले होते. तर शेकापचे पंडित पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.
यानंतर पाच वर्षात शिवसेना व भाजप यांनी या मतदार क्षेत्रात पक्ष मजबूत करण्यास सुरुवात केली. २०१४ साली शिवसेना या मतदारसंघात दुसऱ्या नंबरवर होती. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहण्याची शक्यता आहे. महेंद्र दळवी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची धुरा दिली आहे. त्यामुळे दळवी हे पुन्हा एकदा आमदारकीचे दावेदार असून त्यादृष्टीने त्यांनी सुरुवातही केली आहे. मात्र, पक्षाकडून अजून शिवसेनेचा उमेदवार कोण हे जाहीर झालेले नाही. तरीही पक्षाकडून सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर बॅनरबाजी करण्यात भाजपही मागे नाही
भाजप सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली वाढत आहे. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अलिबाग मुरुड मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे मागण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र तुर्तास तरी याबाबत वरिष्ठ पातळीवरून बोलणी सुरू झालेली नाही. मात्र भाजपकडून अॅड. महेश मोहिते यांना आमदारकीची उमेदवारी मिळू शकते असे वातावरण आहे. अॅड. मोहिते यांचे सुद्धा भावी आमदार म्हणून सोशल मीडियावर बॅनरबाजी सुरू आहे.