रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले असल्याने लोक बेघर झाले आहेत. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजारो विजेचे खांब कोसळल्याने गावच्या गावे अंधारात आहेत. बुधवारी आलेल्या या चक्रीवादळात अलिबाग, श्रीवर्धन, माणगाव या तालुक्यातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी वीज नसल्याने 500 मोबाईल टॉवर बंद पडले आहेत. त्यामुळे संपर्क व्यवस्था कोलमडली आहे. 10 बोटीचे अंशत: नुकसान झाले असून 12 हेक्टर मत्स्य शेती खराब झाली आहे. तसेच 5033 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रायगड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात शेकडो कोटींचे नुकसान... हेही वाचा...'निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठे नुकसान, केंद्र सरकारने पश्चिम बंगालप्रमाणे मदत जाहीर करावी'
'रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत. ज्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब कोसळले असल्याने महावितरणने युद्ध पातळीवर काम करुन तातडीने वीज पुरवठा सुरु करावा. प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामुग्री उपलब्ध करावी,' असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला या सूचना केल्या.
रायगडमध्ये विज पुरवठा अगोदर सुरु करावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रायगड जिल्ह्यामध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे अन्न-पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेचच हाती घ्यावे. महावितरणाने अधिकचे मनुष्यबळ जिल्ह्यात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक ठिकाणी वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या, अशाही सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
रायगड जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. 'रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. 1 लाखांहून जास्त झाडे कोसळली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुड ठिकाणी चक्रीवादळ धडकले. यात सर्वात जास्त फटका श्रीवर्धनला बसला आहे. सदर ठिकाणी सर्व दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत. जिल्ह्यात ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत.' अशी माहिती डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली. तसेच,
'वादळ आणि पावसामुळे अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य होत नाही. दूरध्वनी सेवा खंडीत झाल्याने संपर्क होत नसल्याने नागरिक घाबरले आहेत. त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाहीये. टेलिकॉम यंत्रणा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वीज नसल्याने 500 मोबाईल टॉवरबंद पडले आहेत. 10 बोटींची अंशत: नुकसान झाले आहे. महत्वाचे म्हणजे 12 हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे. तसेच 5033 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे' अशीही माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, माणगाव आणि श्रीवर्धनमध्ये 3 नागरिकांचा चक्री वादळाने मृत्यू झाला आहे. या मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना 4 लाख रुपये सानुग्रह अनुदान लगेचच देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.