रायगड - अवेळी पडत असलेला पाऊस, क्यार चक्रीवादळ आणि त्यानंतर पुन्हा माह चक्रीवादळ, यामुळे दिवाळी सणात जिल्ह्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका समुद्र किनारी बोटिंग, घोडेस्वार, घोडागाडी, उंट सफारी, केटीम सारखा व्यवसाय करणाऱ्यांना बसला आहे. त्यांची दिवाळी यंदा आर्थिक नुकसानीत गेली आहे. लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांवरही याचा परिणाम जाणवत आहे.
दिवाळीत शाळा, कॉलेजांना सुट्टी मिळाल्यानंतर जिल्ह्यात समुद्रकिनारी, किल्ले तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची दिवाळी जोरदार असते. मात्र, यावेळी पावसाने आणि चक्रीवादळाने छोट्या तसेच मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
चक्रीवादळ आणि पावसाने समुद्र किनाऱ्यावरील व्यावसायिकांना फटका हेही वाचा -क्यार चक्रीवादळानंतर मामाहा चक्रीवादळ धडकणार, 1 ते 8 नोव्हेंबर अतिवृष्टीचा इशारा
दिवाळी आली तरी पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. दिवाळी सुरू होण्यापूर्वी क्वार चक्रीवादळ अरबी समुद्रात सुटले. त्यामुळे समुद्र किनारी मौजमजा करण्यास येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवली. आता पुन्हा माह हे चक्रीवादळ 1 ते 8 नोव्हेंबर पर्यंत समुद्रात येणार असल्याने समुद्र किनारी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटक नसल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
हेही वाचा -अवकाळी पावसाने रायगडमधील 582 गावे बाधित; भात शेतीचे मोठे नुकसान
काही प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले असले तरी समुद्र खवळलेला असल्याने बोटिंग करण्यास कोणी धजावत नाहीत. त्यामुळे बोटिंग व्यावसायिक अडचणीत आले आहेत. समुद्रात चक्रीवादळ होणार असले तरी बोटिंग व्यावसायिक स्वतःच्या जबाबदारीवर पर्यटकांना समुद्र सफारी घडवत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती मीनाक्षी केळकर या प्रथमेश बोटिंग व्यावसायिकाने दिली.