महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 17, 2021, 1:50 PM IST

Updated : Jun 17, 2021, 5:26 PM IST

ETV Bharat / state

मोठी दुर्घटना टळली: रेवदंडाजवळ जेएसडब्ल्यूची बार्ज समुद्रात बुडाली, 16 खलाशांना वाचवण्यात यश

रेवदंडा येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीची बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बार्जवरील 16 खलाशांना वाचवण्यात यश आले आहे.

Barj Drown In Revandada Sea
रेवदंडाजवळ समुद्रात बुडाली बार्ज, 16 खलाशांना वाचवण्यात यश

रायगड -विशाखापट्टणम येथील वायझॅक बंदरातून साळव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत लोखंडाचा कच्चा माल घेऊन येणारी बार्ज गुरुवारी 17 मे रोजी रेवदंडा बंदरात बुडाली. भरतीचे पाणी बार्जमध्ये घुसल्याने हा अपघात झाला. या बार्जमध्ये 16 खलाशी अडकून पडले होते. यापैकी 13 खलाशांना तटरक्षक दलाच्या जवानांनी चेतक या दोन हेलिकॉप्टरच्या साहाय्याने, तर तीन जणांना बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन सुमारे तीन तास सुरू होते. तटरक्षक दल, पोलीस, महाराष्ट्र मेरिटाईम विभाग, महसूल यांनी हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केले. एम.व्ही. मंगलम, असे या बार्जचे नाव आहे.

प्रतिक्रिया

बार्ज समुद्रात अडकल्यामुळे खलाशांमध्ये होते भीतीचे वातावरण -

साळव येथे स्टील उत्पादक कंपनी आहे. विशाखापट्टणम येथून बार्जच्या साहाय्याने कच्चा माल समुद्रमार्गे कंपनीतील जेट्टीवर आणला जातो. विशाखापट्टणम येथील वायझॅक बंदरातून दहा ते पंधरा दिवसांपूर्वी एम.व्ही.मंगलम ही बार्ज साळव जेएसडब्ल्यू कंपनीत लोखंडी कच्चा माल घेऊन निघाली होती. या बार्जमध्ये 16 खलाशी प्रवास करत होते. 16 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेवदंडा बंदरातील कोर्लई परिसरातील समुद्रात भरतीच्या उसळलेल्या लाटेमुळे नेहमीच्या मार्गावरून बार्ज बाजूला गेली. त्यामुळे बार्जच्या कॅप्टनने पुन्हा तीला नेहमीच्या मार्गावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. त्यामुळे बार्ज आहे, त्याठिकाणीच थांबविण्यात आली. ही बार्ज भर समुद्रात अडकल्यामुळे खलाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर कॅप्टनने तटरक्षक दल आणि कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना मदतीसाठी संपर्क केला.

बार्ज

हेलिकॉप्टरच्या मदतीने तटरक्षक जवानांनी केले रेस्क्यू ऑपरेशन -

रेवदंडा समुद्रात बार्ज बुडल्याची माहिती कळताच तटरक्षक दल, पोलीस, मेरिटाईम विभाग घटनास्थळी त्वरित दाखल झाले. तटरक्षक दलाने माहिती मिळताच दिघीमार्गे बोटीने पहिले पथक घटनास्थळी पाठविले. या दलाने बार्जमधील तीन जणांना बोटीच्या साहाय्याने समुद्रकिनारी सुखरूप आणले. त्यानंतर आलेल्या तटरक्षक दलाच्या दोन चेतक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने भर समुद्रात भरतीच्या वेळी रेस्क्यू ऑपरेशन करून 13 खलाशांना सुखरूप रेवदंडा किनाऱ्यावर आणले. तीन तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर खलाशांना वैद्यकीय उपचारासाठी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बार्ज

हेही वाचा - शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल - संजय राऊत

Last Updated : Jun 17, 2021, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details