रायगड- राष्ट्रीय बँकांसोबतच खासगी बँकांचे जाळे पसरल्याने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढली आहे. यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक सुधीरंजन पाढी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कृषीकर्ज, कॅशलेस व्यवहार, इतर कर्ज, महिला सक्षमीकरण, अनुत्पादक कर्ज वसुली या पंचसूत्रीवर काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे पार पडले. यामध्ये प्रत्येक शाखेच्या कामगिरीचे मूल्यमापन करून विचारविनिमय करण्यात आला. देशाच्या विकासात बँकांच्या माध्यमातून कोणते योगदान देता येईल याबाबतही शिबीरात चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांसोबत बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी कोणत्या योजना राबवता येतील, हे जाणून घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे सुधीररंजन पाढी यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडिया जिल्ह्याची अग्रणी बँक आहे. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने उपाययोजना करताना कर्ज योजना, डिजिटल सुविधा, मुद्रा योजना, महिला सक्षमीकरण यासंह इतर काही योजनांचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार असून, शिक्षणासाठी कर्ज, पर्यटन तसेच कृषि क्षेत्रासाठी कर्ज आदींचा त्यात समावेश आहे, असे ते म्हणाले.