रायगड - निसर्ग चक्रीवादळाने रस्त्यावर झाडे पडून गावातील, शहरातील मुख्य वाहतूक रस्ते हे बंद झाले होते. वादळ शांत झाल्यानंतर प्रशासनाने त्वरित रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. प्रशासनाने वेळीच रस्ते मोकळे केल्यामुळेच विरोधी पक्षनेत्यांना रायगडच्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सुखरूप करता आला, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात भाजप नेत्यांना लगावला. तसेच प्रशासन कुठे चुकत असेल तर ते शासनाला जरूर सांगावे, असे मतही थोरात यांनी व्यक्त केले. रायगडच्या नुकसानग्रस्तांना अजून भरीव मदत मिळण्यासाठी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत प्रयत्न करणार असल्याचे थोरात म्हणाले.
...म्हणूनच विरोधी पक्षनेत्यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुखरुप, बाळासाहेब थोरातांचा टोला - बाळासाहेब थोरात न्यूज
प्रशासनाने वेळीच रस्ते मोकळे केल्याने विरोधी पक्षनेत्यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुखरूप झाला असल्याचे म्हणत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या नेत्यांना टोला लगावला. नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
रायगडमधील नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. अलिबाग, मुरुड याठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी काही नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईच्या चेकचे वाटप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मुरुड काशीद येथील प्रकृती रिसॉर्टमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन काम करत नाही आणि दिलेली मदतही अपुरी असल्याची टीका आपल्या दौऱ्यात केली होती. याबाबत बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला असता प्रशासनाने त्वरित कामास सुरुवात करून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून आधी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यामुळे प्रशासनाचे योग्य काम सुरू असून रस्ते मोकळे झाल्यामुळेच विरोधी पक्षाचे नेते नुकसानग्रस्त भागाचा दौरा करू शकले असे थोरात यांनी सांगितले. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली असून, आधीच्या तुलनेत तिप्पट भरपाई महाविकास आघाडीने जाहीर केली आहे. मात्र, कोकणात जमीन क्षेत्र कमी असल्याने त्यादृष्टीने भरपाई द्यावी, अशी मागणी येथील लोकप्रतिनिधींनी केली असून, कॅबिनेट बैठकीत वाढीव निधीबाबत विचार केला जाईल, असे उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले.
केंद्राची मदत अजून पोहोचली नसल्याबाबत विचारले असता, केंद्रीय पथक हे मंगळवारी रायगड दौऱ्यावर येत आहे. राज्य शासन आपले काम चोख करीत आहे. येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे चांगली भूमिका ठेवून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रही राहू असे उत्तर बाळासाहेब थोरात यांनी दिले.