रायगड - कोरोनामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून हाताला काम नसल्याने नागरिक घरात बसले आहेत. अशा परिस्थितीत बँकांकडून घेतलेले हप्ते कसे भरायचा हा प्रश्न खातेदारांसमोर उभा ठाकला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांची ही समस्या ओळखून तीन महिने हप्ते बँकेने घेऊ नका, असे आदेश दिले आहेत. मात्र, असे असताना रायगड जिल्ह्यात बजाज फायनान्स कंपनीकडून आरबीआयच्या या आदेशाला नाकारून ग्राहकाकडून कठीण परिस्थितीत हप्ते घेतले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर इतर बँका ह्या ग्राहकाकडून अर्ज भरून घेत आहेत. त्यामुळे ग्राहक हे आपले हप्ते जाणार की नाही जाणार या विवंचनेत अडकले आहेत.
बजाज फायनान्सकडून आरबीआयच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता..हफ्ते वसुली सुरुच - bajaj finance news
रायगड जिल्ह्यात बजाज फायनान्स कंपनीकडून आरबीआयच्या या आदेशाला नाकारून ग्राहकाकडून कठीण परिस्थितीत हप्ते घेतले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर इतर बँका ह्या ग्राहकाकडून अर्ज भरून घेत आहेत.
कोरोना विषाणूने जगभरात सध्या थैमान माजविले असून राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू केली असून सर्व कंपन्या, कार्यालये बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे अनेकजण घरी बसून काम करीत आहेत. मात्र असे असले तरी नागरिकांनी घेतलेले घर,पर्सनल, वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड यावरील हप्ते भरण्याचे टेन्शन ग्राहकांना होते.
आरबीआयने देशातील आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने बँकांना ग्राहकांचे लोनचे तीन महिन्याचे हप्ते घेऊ नका अशा सूचना केल्या आहेत. मात्र सूचना दिल्या असल्या तरी काही बँकां ह्या ग्राहकांना मेसेज पाठवून हप्ते भरण्यास सांगत आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू हप्त्यावर घेण्यासाठी बजाज फायनान्स कंपनी ही सध्या एक नंबरवर असून अनेकांनी या कंपनीतून कर्ज घेतले आहेत. कर्ज हफ्ता भरण्याच्या तारखेच्या चार दिवस आधी मेसेज, फोन कंपनीकडून सुरू केले जातात. मात्र आरबीआयने हफ्ते घेऊ नका अशा सूचना केल्या असतानाही बजाज फायनान्स ग्राहकांना मेसेज पाठवून हफ्ते भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे ग्राहक हे अडचणीत सापडले आहेत. याबाबत आरबीआयने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.