रायगड- मुंबई-गोवा महामार्गाचा पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर हा कधी पूर्ण होणार याचे कोडेच येथील प्रवास करणाऱ्यांना पडले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या चाकरमानी व गणरायाचे आगमन हे खड्डेमय रस्त्याने होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर ठेकेदाराकडून दरवर्षी प्रमाणे महामार्गावर पडलेली खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, हा महामार्ग सुस्थितीत करून प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा ही इच्छा ठेकेदार व प्रशासनाची दिसत नाही, हे या रस्त्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.
गणराया, चाकरमान्यांचा प्रवास यावर्षीही खड्डेमय रस्त्यानेच मुंबई गोवा महामार्गाचा पळस्पे ते इंदापूर हा पहिला टप्पा २०११ला सुरू झाला. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी व प्रवाशांना आनंद झाला होता. मात्र, महामार्गाच्या कामाला दशकपूर्ती पूर्ण होत आली. तरी प्रवाशांना सुखकर प्रवास करण्याचा आनंद अजूनही नॅशनल हायवे व प्रशासनाने प्रवाशांना दिलेले नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर पेण, वडखळ, नागोठणे, माणगाव या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अंतोरे ते पेण, वाशी ते कांदळपाडा या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. मात्र, पुलाचे काम अर्धवट असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेल्या ठिकाणी खडी, माती, टाकून खड्डे भरले जात आहेत. महामार्गावर सतत वाहतूक सुरू असल्याने हे खड्डे पुन्हा निर्माण होत आहेत.
महामार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला जात आहे. मात्र, दरवर्षी पेण ते वडखळ दरम्यान पेव्हर ब्लॉक टाकले जातात. पण, रस्ता सुस्थितीत वाहतुकीसाठी पूर्ण करण्याचे काम ठेकेदाराकडून पूर्ण होतच नाही, ही या महामार्गाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाने रोज प्रवास करणाऱ्या चालकांना, प्रवाशांना पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारखे आजार जडले आहेत.
गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने महामार्गावरचे खड्डे त्वरित भरावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी ठेकेदार व नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार खड्डे भरण्याचे व पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, मागील दहा वर्षांपासून कोकणात जाणारा चाकरमानी व स्थानिक प्रवाशी हा खड्ड्यातूनच प्रवास करीत आहे. त्यामुळे यावर्षीही चाकरमान्यांना व गणरायाला खड्ड्याचे धक्के खातच प्रवास करावा आहे. त्यामुळे पुढील वर्षी तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊन सुखकर प्रवास करण्यास मिळावा, असे साकडे देवाकडे घालत आहेत.