महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून महाड, पोलादपूर धरणांची पाहणी

तिवरे धरणदुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाची पाहणी महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी केली. तर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पोलादपूरमधील देवळे धरणाला भेट देवून पाहणी केली आहे.

By

Published : Jul 4, 2019, 3:16 PM IST

महाड आणि पोलादपूरमधील धरणांची पाहणी करताना लोकप्रतिनिधी

रायगड- चिपळूण येथील धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाची पाहणी महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी केली. तर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पोलादपूरमधील देवळे धरणाला भेट देवून पाहणी केली आहे. तीवरे धरणाच्या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधींसह शासकीय यंत्रणाही आता सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महाडमधील कुर्ला धरण 1968 ला बांधण्यात आले असून धरण महाड नगरपालिकेच्या मालकीचे आहे. धरणाची भिंत धोकादायक नसली तरी पलीकडे जाण्यासाठी बांधलेल्या धरणावरील स्लॅबला तडे गेले आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नाशिक येथील धरण सुरक्षा समितीमार्फत ऑडिट करून कार्यवाही केली जाईल, असे नगराध्यक्षा जगताप यांनी यावेळी सांगितले.


शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनीही पोलादपूरमधील देवळे धरणाला भेट देवून पाहणी केली. धरणाच्‍या भिंतीला तळाच्‍या बाजूला अनेक ठिकाणी गळती असल्‍याने या धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही. त्‍यामुळे धरण बांधून त्‍याचा उपयोगच होत नाही. या पार्श्‍वभूमीवर आमदार गोगावले यांनी धरणाची पाहणी केल्‍यानंतर आपण या कामासाठी मुख्‍यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्‍याचे सांगितले.

दुर्गम डोंगराळ पोलादपूर तालुक्‍याच्‍या पिण्‍याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न निकाली निघावा यासाठी शासनाच्या जलसंधारण विभागाकडून देवळे धरणाचे बांधकाम करण्यात आले. धरणाच्या बांधकामासाठी आजवर 4 कोटी 35 लाख 22 हजार रूपये निधी खर्च झाला. धरणाचे काम पूर्ण होऊन 16 वर्ष लोटली आहेत. पण निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धरणाला पहिल्यावर्षीपासूनच मोठी गळती लागली आहे.

तीवरे धरण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांना जाग आली असून आता तरी धरणाची परिस्थिती बदलेल, अशी आशा रायगडकर करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details