रायगड - पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात दुपारच्या वेळी रस्त्यावर फिरत असलेल्या मोकाट बैलाला बेशुद्ध करून त्याला पळवून नेण्याचा कट पनवेलमधील प्राणिमित्रांच्या सतर्कत्यामुळे हाणून पाडण्यात यश आले. कालच खारघरमध्ये जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन गायी, म्हशींच्या तस्करीचा प्रयत्न समोर आला होता. त्यानंतर आज पुन्हा खांदा कॉलनी परिसरात बैलाला बेशुध्द केले जात असल्याचा प्रकार घडल्याने पनवेल शहरात संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
मंगळवारी खारघरमध्ये रविशंकर शाळेसमोर दोन म्हशींना गुंगीचे औषध दिल्याने, या म्हशी बेशुद्ध अवस्थेत आढळल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही म्हशींना शुद्धीवर आणून त्यांना त्यांच्या मालकाच्या ताब्यात ही दिले. या म्हशींची तस्करी करण्याचा डाव असल्याचा संशय येथील नागरिक व्यक्त करत आहेत. या घटनेला 24 तासही पूर्ण होत नाही तितक्यात पुन्हा आज खांदा कॉलनी परिसरात एक बैल बेशुद्धावस्थेत आढळून आला. या बैलाला देखील कोणीतरी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते. यात गुंगीच्या औषधामुळे बैलाच्या आरोग्याची स्थिती गंभीर झाली होती. मात्र, पुन्हा एकदा येथील प्राणीमित्र मित्तल यांच्या सतर्कतेने बैलाची तस्करी करण्याचा डाव पुन्हा फसला.