महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यासोबत वाचवणारा पोलीसही जखमी - yogesh

नवी मुंबई पोलिस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, संबंधित युवक आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा शिघ्र कृती दलाचा पोलीस, असे दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत. योगेश चांदणे ( वय 30) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातला आहे.

पोलीस मुख्यालय

By

Published : Jun 22, 2019, 6:15 PM IST

रायगड -नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, संबंधित युवक आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा शिघ्र कृती दलाचा पोलीस, असे दोघेही खाली पडून जखमी झाले आहेत.


योगेश चांदणे ( वय 30) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातला आहे. योगेश सकाळी 10 च्या सुमारास कळंबोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला. तेथून मी आत्महत्या करतो, असे ओरडत होता.


हे कळल्यानंतर ताबडतोब कळंबोली पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस इमारतीच्या गच्चीवर त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र पोलिसांना पाहून तो आणखी कावराबावरा झाला.


दरम्यान खाली, इमारतीवरून उडी मारणाऱ्याची धमकी देणाऱ्या योगेशला झेलण्यासाठी पोलिसांनी कापडाच्या झोळ्या तयार केल्या. मदतीसाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

पोलीस मुख्यालय
एक पोलीस पाण्याच्या टाकीवर चढून योगेशला समजावत होते. दरम्यान शिघ्र कृती दलाचे पोलीस स्वप्निल मंडलिक यांनी योगेशला मागून झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र योगेशने टाकीच्या काठाकडे झेप घेतली.


त्यामुळे योगेश आणि स्वप्निल दोघेही टाकीवरून ७ फूट खाली पडून जखमी झाले आहेत. दरम्यान दोघांनाही कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
योगेश हा नैराश्याने ग्रस्त आहे. त्यामुळे नैराश्यातून तो आत्महत्या करणार होता, अशी माहिती आहे. आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे पोलीस स्वप्निल मंडलिक यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details