महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 6, 2019, 10:40 PM IST

ETV Bharat / state

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: अभय कुरुंदकरच्या जामीन अर्जासह आरोप निश्चितीवर ११ जूनला सुनावणी

आरोपी एक अभय कुरुंदकर याचा जामिनासाठीचा अर्ज आरोपी वकिलाकडून न्यायालयात दाखल केला आहे. जामीन अर्जावर व आरोप निश्चितीबाबत ११ जून रोजी सत्र न्यायाधीश एम जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अश्विनी बिद्रे

रायगड- सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याची सुनावणी अलिबाग सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्यातील दोन नंबरचा आरोपी राजेश पाटील याला दोषमुक्त करण्याबाबत आरोपी पक्षाच्या वकिलामार्फत युक्तिवाद केला असून तो विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी खोडला आहे. तर आरोपी एक अभय कुरुंदकर याचा जामिनासाठीचा अर्ज आरोपी वकिलाकडून न्यायालयात दाखल केला आहे. जामीन अर्जावर व आरोप निश्चितीबाबत ११ जून रोजी सत्र न्यायाधीश एम जे. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अलिबाग सत्र न्यायाधीश एम. जे मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. आरोपी विरोधात आरोप निश्चित करण्याबाबत विशेष सरकारी वकील अड. प्रदीप घरत यांनी ३ जूनच्या सुनावणी वेळी युक्तिवाद केला होता. त्यावर आज आरोपी पक्षातर्फे उत्तर देण्यासाठी सुनावणी होणार होती. त्यानुसार या खटल्यातील आरोपी नंबर दोन राजेश पाटील याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याचे आरोपीचे वकील अॅड. प्रसाद पाटील यांनी युक्तिवाद मांडला.

न्यायालयाने आरोपींच्या वकीलाच्या युक्तीवादावर विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. घरत यांनी राजेश पाटील याला का दोषमुक्त करू नये? तसेच त्याच्या विरोधात असलेले पुरावे याबाबत युक्तिवाद केला.

अश्विनी बिंद्रे खून प्रकरणातील मुख्य एक नंबर आरोपी अभय कुरुंदकर याच्या बाबत युक्तिवाद करण्यास आरोपीच्या वकिलांना सांगितले, तेव्हा त्यांनी आरोपीला जामीन द्यावा यासाठी अर्ज केला. यावेळी आरोपी पक्षाचे वकील अॅड. भानुशाली यांनी आरोपी विरोधात आरोप निश्चित होण्यापूर्वी जामीन अर्जावर सुनावणी व्हावी, असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की चार्जशीट प्रमाणे युक्तिवाद करण्याचा तुम्हाला हक्क आहे.

आरोपीच्या वकिलांनी आम्हाला जामिनावर युक्तिवाद करायचे आहे, असे सांगितले. त्यावेळी न्यायालयाने सांगितले की, जामीन अर्ज व युक्तिवाद या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे चार्ज कोणते ठेवावेत याबाबत ११ जूनला सुनावणी असल्याचे न्यायालयाने सांगितले, असे विशेष सरकारी वकील अड. प्रदीप घरत यांनी सांगितले. त्यामुळे जामीन अर्जावर युक्तिवाद हा ११ जून रोजी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details