रायगड - जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपला असल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. 1 मे पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार होती. मात्र जिल्ह्यात लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने आजचा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा लसीकरण मुहूर्त टळला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू केले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यात अडीच लाख नागरिकांनी घेतली आहे लस -
16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर आजपर्यंत अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचे डोस घेतले आहेत. जिल्ह्यात 89 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र लसीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने सद्यस्थितीत सर्वच लसीकरण केंद्र बंद करण्यात आलेली आहेत.