पनवेल:पत्नी नांदायला येत नसल्याने तिच्या विरहापोटी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल तालुक्यातील आजीवाली गावात ही घटना घडली असून दत्तात्रय सुरेश धायगुडे असे या त्यांचे नाव आहे. ते नवी मुंबईतील महापे येथे कार्यरत होते.
घटनास्थळी चौकशी: मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास आजीवलीच्या पोलीस पाटलांनी कोण गावच्या बीटचौकीला फोन करत आजीवलीतील गगनगिरी सोसायटीतील एका घरातून वास येत असल्याचे कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजूच्या सोसायटीत राहणारे धायगुडे यांचे मावस भाऊ राहुल येळे यांना तेथे बोलावून घेतले.
आत्महत्येचा प्राथमिक अंदाज:पोलिसांनी दोन पंचांसमोर वास येत असलेल्या रूमचा दरवाजा तोडला असता, धायगुडे यांनी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मावस भाऊ राहुलकडे चौकशी केली असता. धायगुडे यांची पत्नी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून वेगळी राहत असून त्यांच्याकडे नांदायला येत नव्हती. त्यामुळे पत्नीच्या विरहापोटी त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
तपास ग्रामीण पोलिसांकडे: सपोनी धायगुडे हे शुक्रवारी सकाळी शेवटचे आपल्या मावस भावास भेटले होते. त्यानंतर ते कोणासही भेटले नाहीत. त्यामुळे सदरची घटना ही शुक्रवारी दुपारी घडलेली असावी, असा अंदाज आहे. या प्रकरणी पुढील तपास पनवेल ग्रामीण पोलीस करत आहेत.