मुंबई : राज्याच्या गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने काल (बुधवार) सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह फिरोज शेख आणि नितिश सारडा यांनाही १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
२०१८ सालच्या एका आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर त्यांना अलिबाग जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सकृत दर्शनी पुरावा आढळला नाही. त्यामुळे सरकार पक्षाची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण..
अलिबाग तालुक्यातील कावीर या गावात अन्वय नाईक याचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात अन्वय नाईक याची आई कुमुद नाईक आणि अन्वय नाईक राहत होते. अन्वय नाईक यांचा मुंबई येथे घर सजावटीचा (इंटिरेअर डिझाईनिंग ) व्यवसाय होता. या व्यवसायातील उधारी वसूल न झाल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे घेणेकरी यांनी पैशाचा तगादा लावला होता. याला कंटाळून 5 मे 2018 रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आई आणि मुलाने आत्महत्या केली. त्यावेळी मृत्यूपूर्वी नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीने पैसे थकवल्याचा आरोप अन्वय नाईकने केला होता. अर्णबने आपले ५.४० कोटी रुपये थकवल्यामुळे आपण आर्थिक संकटात आल्याचा या चिठ्ठीत उल्लेख होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी अली होती.